sushreya prakashan logo
आमच्या विषयी आमची प्रकाशने दिवाळी अंक सुवर्णक्षण वितरक यादी संपर्क

2014 हे ‘सुश्रेय प्रकाशन’चे दशकपूर्तीचे वर्ष. 2004 साली सौ. श्वेता गानू यांनी ‘सुश्रेय प्रकाशन’ची निर्मिती केली. बँकेतील नोकरी सांभाळत सौ. श्वेता यांनी आकाशवाणी, वृत्तपत्र, दूरदर्शन या माध्यमांतील अनेक कार्यक्रमांत वेगवेगळ्या भूमिकांतून सहभाग दिला. आघाडीच्या लोकसत्ता, तरूण भारत, नवशक्ती या वृत्तपत्रांसाठी तर शब्दांगण, उद्योगश्री अशा मासिकांतून लेखन केले. आकाशवाणी, दूरदर्शन वरील वनिता मंडळ, सुंदर माझं घर, ज्ञानदीप, उद्यम जगत, किलबिल अशा कार्यक्रमांतून सातत्याने सहभाग, एकांकिका लेखन तसेच ‘सहज सुचलं म्हणून’ या कार्यक्रमाचे संवाद लेखन केले. बँकेतल्या नोकरीमुळे त्यांचा जनसंपर्क वाढत होता तर दुसरीकडे, विविध माध्यमातून लेखनाचा अनुभव त्यांच्या खात्यावर जमा होत होता. त्यातूनच ‘मुग्धा’ हा पहिला कथासंग्रह ‘नीहारा’ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला. या कथासंग्रहाची राज्यशासनाच्या ‘नवलेखक अनुदान योजने’त निवड झाली आणि सौ. श्वेता यांच्यातल्या साहित्यिकाला पहिली कौतुकाची थाप मिळाली. स्टेट बँकेच्या सेवेत असताना त्यांचा उद्योग जगत आणि अनेकविध उद्योजकांशी दररोज संपर्क होत होता. त्यांची उद्योग वाढवण्यासाठीची धडपड, चिकाटी, जिद्द इ. त्या जवळून बघत होत्या. त्यामुळे काल्पनिक कथांमध्ये रमण्यापेक्षा वास्तवात घडणार्‍या ह्या प्रेरणादायी कथा लोकांसमोर ठेवाव्यात या उद्देशाने त्यांनी ‘उद्योजकांची तपश्‍चर्या’  हे उद्योजकांवरील पहिले पुस्तक ‘नीहारा’ तर्फे प्रकाशित केले.

shweta ganu

‘दिसामाजि काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ या समर्थ वचनाला अनुसरून, घर, नोकरी, लेखन अशी तारेवरची कसरत सुरू असताना 2001 साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. उपलब्ध झालेल्या अतिरिक्त वेळामुळे वाचन, लेखन, चिंतन अधिक जोमाने सुरू झाले. विविध प्रकाशनसंस्थांसोबत साहित्य प्रकाशित करत असताना सौ. श्वेता यांच्यातील उद्योजिका जागी झाली आणि स्वत: चीच प्रकाशन संस्था काढण्याच्या विचाराने जोर धरला. यातूनच एका प्रकाशिकेचा जन्म झाला. प्रकाशन संस्थेचे नाव ठरले, ‘सुश्रेय’ !  सुस्वर आणि श्रेयस या दोन मुलांच्या आद्याक्षरांमधून जन्मलेले हे तिसरे अपत्यच जणू!  त्यामुळे नाव ‘सुश्रेय’. 2004 साली ‘स्वयंसिद्धा’ या महिला उद्योजकांवरील पुस्तकाचे सौ. श्वेता यांनी लेखन केले व ‘सुश्रेय’ प्रकाशनाने साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यानंतर, अशा उद्योग भगीरथांच्या चरित्रांची मालिकाच ‘सुश्रेय’ तर्फे प्रकाशित केली गेली आणि ‘यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथांचा अभ्यासात्मक दृष्टीने प्रवास’ ही ‘सुश्रेय प्रकाशन’ची एक विशेष ओळख निर्माण झाली.

‘सुश्रेय’ला वाढवणे वाटते तेवढे सोपे काम नव्हते. परंतु, कामावरील निष्ठा, प्रचंड जिद्द, उत्साह, कल्पकता ह्या सार्‍याला घरातल्या मंडळींचे मिळालेले भक्कम पाठबळ यामुळेच आज ‘सुश्रेय’ ‘दशकपूर्ती’ करीत आहे. सौ. श्वेता यांचे पती श्री. शंभूनाथ गानू यांनीही सरकारी सेवेतून उच्च अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यावर अन्य काही न करता ‘सुश्रेय’ला संपूर्ण वेळ दिला. त्यामुळे हे काम अधिक विस्तारले.

‘सुश्रेय’ चे प्रत्येक पुस्तक जसे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण तसाच त्याचा प्रकाशन समारंभ देखील अतिशय देखणा, कल्पकतेने योजना केलेला. केवळ रिबीन सोडून नेहमीप्रमाणे पुस्तकाचे प्रकाशन न करता त्यातील आशयाला अनुसरून त्याप्रमाणे व्यासपीठावर नेपथ्य करून केलेले प्रकाशन उपस्थितांसह मान्यवर प्रमुख पाहुण्यांचीही दाद मिळवून जाते.

आज, वयाच्या साठीनंतरही एखाद्या तरूण उद्योजिकेप्रमाणे जातीने प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून, कल्पकतेने आणि चिकाटीने प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याच्या त्यांच्या धडाडीमुळे ‘सुश्रेय’ प्रकाशनाने प्रकाशन क्षेत्रात आपली मोहर उमटवली आहे. विविध क्षेत्रातील नामवंतांनी ‘सुश्रेय’चे काम वाखाणले आहे. मा. जयंतराव साळगांवकर, मा. बाळासाहेब ठाकरे, मा. सुशीलकुमार शिंदे, मा. मनोहर जोशी, मा. पृथ्वीराज चव्हाण, मा. नितीन गडकरी, मा. मनोहर पर्रीकर, मा. डॉ. श्रीमती स्नेहलता देशमुख, मा. कुमार केतकर, श्री. एकनाथ ठाकूर, मा. प्रतापरावर पवार, श्री. अशोक पानवलकर, श्री. अच्युत गोडबोले, श्री. दीपक घैसास, ‘पितांबरी’चे मा. वामनराव प्रभुदेसाई आदी ज्येष्ठांच्या कौतुकाची थाप मिळाली.  अन्य पुस्तकांसोबतच आजपर्यंत 178 उद्योजकांची यशोगाथा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘सुश्रेय’ ने केले आहे. सौ. श्वेता गानू यांच्या धडाडी, कार्य यांचे संचित सोबत घेऊन ‘सुश्रेय’च्या कामाचा आलेख सतत उंचावत राहणार आहे.

दशकपूर्तीच्या वर्षातच ‘उद्योग अनुभव प्रतिष्ठान’ची मुहूर्तमेढ म्हणजे ‘सुश्रेय’च्या कार्याचा एक नवीन आयामच म्हणावा लागेल. दीपावली अंक व दरवर्षी प्रकाशित होणार्‍या विविध संकल्पनांवरील आधारित ‘दैनंदिनी’ हे सुश्रेय प्रकाशनाचे लोकप्रिय उपक्रमही ‘सुश्रेय’च्या प्रगतीत मोठे साहाय्यक ठरले आहेत.


Copyright 2014. सुश्रेय प्रकाशन. All rights reserved
Website designed by RuMi Technology
सौजन्य saintangelos